सिकंदरपूर गावाला ‘सुंदर गाव’ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक उपक्रमशील नेतृत्व आणि लोकसहभागाची उज्ज्वल कामगिरी

सिकंदरपूर गावाला ‘सुंदर गाव’ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक
उपक्रमशील नेतृत्व आणि लोकसहभागाची उज्ज्वल कामगिरी?

लातूर, दि. ११

लातूर तालुक्यातील मौजे सिकंदरपूर या गावाने विकास, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा प्रभावी समन्वय साधत आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावून एक इतिहास घडवला आहे. ग्रामविकासाच्या विविध क्षेत्रांत गावाने केलेली लक्षणीय प्रगती, शाश्वत विकासाच्या दिशा आणि एकत्रितपणे केलेले परिपूर्ण नियोजन याचा योग्य गौरव या पारितोषिकाच्या रूपाने झाला.

गावाच्या या यशात उपक्रमशील आणि उच्चशिक्षित सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी के. बी. कलबुने यांचे अथक परिश्रम महत्त्वाचे ठरले. गावात स्वच्छता मोहिमा, पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था, वृक्षलागवड आणि संवर्धन, कचरा व्यवस्थापन, प्रकाशयोजना, सामाजिक उपक्रम, महिला बचत गटांचे बळकटीकरण आणि ग्रामसभांचे नियमित व सहभागात्मक आयोजन या सर्व क्षेत्रांत सातत्याने पथदर्शी काम करण्यात आले.

या उल्लेखनीय कामगिरीनंतर महाराणा प्रताप नगरचे वरिष्ठ लिपिक विकास पवार, ग्रामपंचायत सदस्य संजय आडे, तसेच संगणक परिचालक सोमनाथ पांचाळ यांनी सरपंच गंभीरे आणि ग्रामविकास अधिकारी कलबुने यांचा पुष्पगुच्छ, भव्य पुष्पहार आणि पेढे भरवून उत्साहपूर्ण सत्कार केला. गावातील इस्माईल तांबोळी, इंगोले, साळुंके यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला.

सिकंदरपूरचे हे यश केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून—गाव एकत्र आल्यास बदल शक्य आहे, याचा उभा आदर्श आहे. विकासाच्या दिशेने सिकंदरपूरने घडवलेले मॉडेल आता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Scroll to Top