राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सरपंच रेशमा गंभीरे सन्मानित
संचार प्रतिनिधी, लातूर – दि. १३
सिंकदरपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रेशमा माधव गंभीरे यांना १२ मे रोजी पन्हाळागड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, वीर बाजी प्रभू देशपांडे स्मृती स्थळ येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. संतोष प्रभू तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मानाचा शाहू फेटा, शाल, श्रीफळ, स्मृतीशिल्प आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव झाला.
सरपंच रेशमा गंभीरे यांनी कोरोनाच्या काळातील आरोग्य सेवा, ग्रामस्वच्छता, शिक्षण, वृक्षलागवड व संवर्धन, महिला बचत गटांचे सशक्तीकरण, सुशिक्षित बेरोजगारांसाठी उपक्रम, जल पुनर्भरण आदींसह शासनाच्या नऊ थीम व सतरा उद्दिष्टांच्या अनुषंगाने विविध नाविन्यपूर्ण कामे राबवून गावाच्या विकासाला नवे पर्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात सिकंदरपूर ग्रामपंचायतीने लक्षणीय प्रगती साधली आहे. उच्चशिक्षित आणि उपक्रमशील सरपंच म्हणून त्या ओळखल्या जातात.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. सरपंच गंभीरे यांनीही आपल्या कार्यकाळातील वाटचालीचा आढावा मांडला. यावेळी सरपंच सेवा महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष माधव गंभीरे, लातूर जिल्हाध्यक्ष पंकज शेळके, निवड समिती सदस्या माधुरी भोसले, अपराजित मरगणे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल रेशमा गंभीरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



