मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ” फिरते न्यायालय – मोबाईल व्हॅन ” उपक्रमात कायदेविषयक जनजागरण
लातूर –
सिकंदरपूर, दि. १ डिसेंबर २०२५ ग्रामीण विकास व पंचायतराज यंत्रणेला मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत आज लातूर तालुक्यातील ग्रामसंसद भवन सिकंदरपूर येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) व ग्रामसंसद सिकंदरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” फिरते न्यायालय – मोबाईल व्हॅन ” उपक्रमात ग्रामस्थांना कायदेविषयक माहिती व जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील गावकऱ्यांना न्यायिक सेवा सहज उपलब्ध होईल आणि अभियानाचे उद्दिष्ट साध्य होईल, असे आयोजकांनी सांगितले.
या शिबिरात ग्रामस्थांना महिला विषयक कायदे, सिनियर सिटीझन कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कसे गोर गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना त्यांच्या न्यायिक अडचणी सोडविण्यासाठी मदत करते याची माहिती देण्यात आली. मोबाईल व्हॅनमध्ये डिस्प्ले बोर्ड, व्हिडिओ प्रेझेंटेशन आणि तज्ज्ञांच्या व्याख्यानांचा समावेश होता. शिबिरात २०० हून अधिक ग्रामस्थांनी ( महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग ) उपस्थिती लावली आणि त्यांना मोफत कायद्याच्या पुस्तिका, सल्लामसलत व कायदेशीर मदत फॉर्म दिले गेले.

विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायमूर्ती व्ही. एन. गिरवलकर साहेब यांनी मुख्य व्याख्यान दिले आणि गोर गरीबांसाठी उपलब्ध असलेल्या योजना ( मोफत विधी सेवा, लोक अदालत, मीडिएशन ) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. रेशमा माधव गंभीरे सरपंच स्मार्ट व्हिलेज, सिकंदरपूर यांनी शिबिराचे स्वागत केले आणि ग्रामस्थांना कायद्याची जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले. यशदा प्रवीण प्रशिक्षक माधवराव गंभीरे यांनी प्रस्ताविकात ग्रामसभा स्तरावर अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. अँड. गुरुसिद्ध जे. मिटकरी यांनी जमीन विवाद व RTI प्रक्रियेवर विशेष चर्चा केली, तर सोमवंशी मॅडम ( सहाय्यक न्याय रक्षक ) यांनी महिला व बालकल्याण कायद्यांवर सल्ला दिला. तिवारी साहेब (मुख्य न्याय रक्षक) मिटकरी साहेब (उपमुख्य न्याय रक्षक) शेळके मॅडम गायकवाड यांनी ही ग्रामस्थांसोबत थेट चर्चा केली आणि वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी मदत जाहीर केली.
या उपक्रमांद्वारे ग्रामपंचायतींना सक्षम करणे हे उद्दिष्ट आहे. DLSA सोबतचे हे सहकार्य ग्रामीण भागातील कायदेशीर जागरूकता वाढवेल आणि गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरणास मिळवण्यास मदत करेल.” DLSA लातूर सचिव गिरवलकर साहेब यांनी नमूद केले की, “अशा मोबाईल व्हॅनद्वारे दरमहा १० गावांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आहे. यामुळे शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळेल.”
ग्रामस्थांनी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला. सिकंदरपूरसारख्या दुर्गम भागात अशा उपक्रमांची खरी गरज आहे, असे स्थानिक नेते म्हणाले.
अभियानाचे फायदे: या उपक्रमामुळे गावकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही असे शिबिरे राबवली जातील.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन मुख्याध्यापक तळभोगे सर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत अधिकारी कलबूने के. बी. यांनी केले



