“स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूरमध्ये नाविन्यपूर्ण ‘ सुकन्या वृक्ष लागवड ‘ उपक्रमाचा श्रीगणेशा ”
या पुढे लावलेल्या प्रत्येक झाडावर एका मुलीचे नाव अंकित – सुकन्या समृद्धी योजनेला जोडून मुलींच्या भविष्यासाठी हरित संदेश..! ”
प्रा. रेशमा गंभीरे, सरपंच सिकंदरपूर,
लातूर, –
लातूरच्या जिल्हाअधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग), तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूरच्या उपक्रमशील सरपंच प्रा. रेशमा माधवराव गंभीरे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान’ अंतर्गत ‘सुकन्या वृक्ष लागवड’ उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमात लावलेल्या प्रत्येक झाडावर एका मुलीचे नाव अंकित करण्यात येईल, ज्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेला जोडून मुलींच्या भविष्यासाठी हरित संदेश दिला जाईल.
सरपंच प्रा. रेशमा गंभीरे यांच्या हस्ते १०० मोठी झाडे लावून या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. यापूर्वी जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी वृक्ष लागवडबाबत जनजागृती फेरी काढली. त्यानंतर शाळेजवळील येडाई मंदिर आणि शाळेच्या ग्रीन बेल्टमध्ये मोठ्या झाडांची लागवड करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या नावांनी या झाडांवर पट्ट्या लावण्यात येणार असून, ग्रामसंसद ही या झाडांचे संगोपन करेल. ही आठवण त्या झाडे टिकून असतील तेव्हापर्यंत राहील. भविष्यातही जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या नावांनी वृक्ष लागवड केली जाईल.
या प्रसंगी यशदा मास्टर ट्रेनर माधव गंभीरे, ग्रामपंचायत अधिकारी कलबूने के. बी., मुख्याध्यापक श्री. तळभोगे सर, सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळ, ग्रामस्थ आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
____
* उपक्रमाचे उद्दिष्ट:
– लाडक्या कन्यांचे स्वागत करून मुलींचा जन्मदर वाढवणे.
– सज्ञान झाल्यानंतर विवाह करण्याबाबत जनजागृती करणे.
– अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेत मुलींना मोफत शिक्षण देऊन, गावात लावलेल्या झाडांवर त्यांची नावे अंकित करणे.
– यामुळे महिलांना आदिशक्ती म्हणून सन्मानित करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे.
हा उपक्रम सिकंदरपूर ग्रामपंचायतीच्या स्मार्ट व्हिलेज ध्येयाशी सुसंगत असून, मुलींच्या सक्षमीकरण आणि हरित विकासाला प्रोत्साहन देईल.
____________



