जिल्हास्तरीय स्वच्छ ग्राम स्पर्धेत सिकंदरपूरला द्वितीय क्रमांक समन्वित प्रयत्नांमुळे ‘स्वच्छता’ क्षेत्रात गावाची भरारी
लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन (स्वच्छ भारत मिशन–ग्रामीण) तसेच जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०२२–२३ चा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत लातूर तालुक्यातील सिकंदरपूर ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल गावाला ४ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
जिल्हा परिषद लातूरच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) मोहन अभंगे यांच्या हस्ते चार लाखांचा धनादेश आणि प्रशस्तिपत्र देऊन उपक्रमशील सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे व ग्रामसेवक के. बी. कलबूने यांचा सन्मान करण्यात आला.
सिकंदरपूरच्या स्वच्छता उपक्रमांमध्ये कचरा व्यवस्थापन, घरगुती घनकचरा संकलन, प्लास्टिक मुक्त मोहिमा, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, स्वच्छ शौचालयांची उपलब्धता, पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा, वृक्षलागवड आणि ग्रामस्थांचा व्यापक सहभाग अशा विविध कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. गावाने स्वच्छतेबाबत जनजागृतीचे सातत्यपूर्ण उपक्रम राबवत ‘स्वच्छ गाव’ निर्माण करण्याचा आदर्श दाखविला आहे.
या सोहळ्यात यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे, उपसरपंच पिराजी इटकर, सदस्य उद्धव गंभीरे, मंगलबाई ताटे, बाळूबाई इटकर, रामूबाई लष्करे, भास्कर गरगट्टे, गहिनीनाथ बोयने, दिगंबर कदम, महेश गंभीरे उपस्थित होते.
सिकंदरपूरच्या या सन्मानानंतर माजी सरपंच शामराव गंभीरे, बंकटराव देशमुख, दत्तात्रय एकीले, शिवूबाई इटकर, तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम गंभीरे, उपाध्यक्ष राजेंखा पठाण, राष्ट्रीय गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम गंभीरे, शिक्षक नेते केशव गंभीरे, मारुती गंभीरे, दिलीप गंभीरे, श्रीपती सुरवसे, काकासाहेब गंभीरे, सतीश गंभीरे, उमाकांत गंभीरे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष ज्योतीराम कदम, उपाध्यक्ष रोहित गंभीरे, निमंत्रक दयानंद सुरवसे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे अभिनंदन केले.
सिकंदरपूरच्या या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले की—ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि नेतृत्व यांची एकजूट असेल तर कोणताही विकासाचा मार्ग कठीण राहत नाही. गावाने घडवलेले स्वच्छतेचे मॉडेल आता इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



