गाव तिथे शासकीय कर्ज योजना: युवा उद्योजकांसाठी व्यवसाया बद्दल मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा

सिकंदरपूर मध्ये युवा उद्योजकांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा; गाव तिथे शासकीय कर्ज योजनांचे सविस्तर मार्गदर्शन

लातूर, दि. ९ डिसेंबर २०२५ स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूरमध्ये ( तालुका लातूर) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत (१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर) गावस्तरावर शासकीय कर्ज व उद्योग सुलभता योजनांचे जागरूकता कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. या अभियानाच्या उपजीविका विकास घटकांत फिट बसणाऱ्या या उपक्रमांतर्गत आज युवा उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

मोठ्या संख्येने ग्रामस्थ युवा व तरुणांनी उपस्थिती लावली असून, त्यांना स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गावच्या उपक्रमशील सरपंच प्रा. रेश्मा माधवराव गंभीरे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्र लातूरचे महाव्यवस्थापक श्री. प्रवीण खडके, श्री. एम डी. सूर्यवंशी ( उद्योग अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र लातूर ), श्री. प्रशांत पाटील ( जिल्हा समन्वयक – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ लातूर ), सौ. शिवमती वैशालीताई लोंढे ( मा. संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ), यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामसंसद भवन सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत जिल्हा उद्योग केंद्र लातूरच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कर्ज योजना ( जसे की प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया, मुख्यमंत्री युवा स्वनिरभर योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, CMEGP आणि PMEGP ) या विषयावर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत युवा उद्योजकांना कर्ज मंजुरी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे ( आधार, PAN, व्यवसाय प्लॅन, बँक खाते), सबसिडी (३०-७५% पर्यंत, SC/ST/महिलांसाठी जास्त सवलत ), व्याजदर ( ६.५-९% ) आणि परतफेड पर्याय याबाबत माहिती देण्यात आली. विशेषतः शेतकरी गट, महिला बचत गट ( SHG ) आणि युवा गटांसाठी उपलब्ध ₹५०,००० ते ₹१० लाखांपर्यंतच्या कर्ज योजना व १५-५०% सबसिडीवर भर देण्यात आला. सहभागींना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ( mudra.org.in, pmegp.in ) शिकवण्यात आली आणि पात्र लाभार्थ्यांसाठी तात्काळ अर्ज भरण्यास प्रोत्साहन देण्यात आले. सुमारे १०० हून अधिक युवकांनी या सत्रात भाग घेतला, ज्यात ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यावर भर देण्यात आला.

 

सरपंच सौ. रेश्मा गंभीरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिकंदरपूरला आदर्श गाव म्हणून प्रस्थापित करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. युवकांना स्वावलंबी बनवून गावाचा आर्थिक विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.” जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. प्रवीण खडके यांनी सांगितले की, ” या योजनांमुळे ग्रामीण उद्योगांना चालना मिळेल आणि जिल्हा उद्योग केंद्र लातूरच्या सहकार्याने अधिकाधिक लाभार्थी तयार केले जातील.”

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपसरपंच पिराजी इटकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी कलबूने के. बी., सी.आर.पी. राधेश्वरी जाधव, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि स्थानिक नेत्यांचा सहभाग होता. पुढील टप्प्यात अर्ज फॉलो-अप आणि यशस्वी उद्योजकांचे उदाहरण प्रदर्शित करण्यात येतील. या कार्यशाळेमुळे सिकंदरपूर ग्रामपंचायतीला अभियानात अतिरिक्त गुण मिळण्यास मदत होईल आणि गावातील १०० हून अधिक कुटुंबांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Scroll to Top